Monday 22 December 2014

सखा, सारथी, सदगुरु - बापू

माझ्या घरी मी लहान होतो तेव्हा पासूनच धार्मिक वातावरण मी अनुभवलेलं आहे … घरी आई , बाबा आणि माझी आजी असे सर्वच देवपूजे मध्ये रुजू असायचे … आठवते सकाळी मी बिछान्यात असतांना माझे बाबा रोज सकाळी म्हणणारी साई बाबांची आरती " जय देव जय देव दत्ता अवधूता , साई अवधूता , जोडूनी कर तव चरणी ठेवितो माथा " माझी आई ही नेहमी पूजापाठ आणि  पोथी पारायणामध्ये मग्न असायची त्यामुळे साहजिकच माझं ही आकर्षण देवा कडे वाढलं … सकाळी अंघोळ करून झाल्यावर सर्वात आधी देवघरा समोर जाऊन देवाची प्रार्थना करायची … चौथीत असेन मी तेव्हा कदाचित …रोज सकाळी गणपतीची ' सुखकर्ता दुखार्ता ' ही आरती म्हणायचो … पुढे मोठ्या बहिणीने सांगितलं कधी ही काही दुखलं खुपलं की को-या पानावर ' Sai Sai Sai Sai Sai ' असं लिहून काढायचं पान भरून … मग कधी पोटात वगैरे दुखायला लागलं की मी एक दोन पानं ' Sai Sai Sai Sai Sai ' लिहून काढायचो आणि पोट दुखी गायब व्हायची …. देवा वर विश्वास अजून दृढ होत गेला …


२००२ सालाची गोष्ट… १२वीत होतो … त्यावेळी घरी वार्ताहार  नावाचा पेपर यायचा आणि त्यात ''अनुभूतीचे बोल '' म्हणून बापूंचे  आलेले भक्तांना अनुभव  यायचे …. आठवतो पहिला अनुभव वाचलेला… एका मुलीने चेह-यावरचे पिम्पल्स जाण्यसाठी केलेले बापूंचे  नामस्मरण आणि त्याने पिम्पल्स गेल्याची तिला आलेली प्रचिती ….सायन्स स्टुडंट असणा-या मला हे वाचून वाटलं होतं की कमाल आहे ?… असं कसं होऊ शकतं ? मग एके दिवशी आईने वाण्याकडे पाठवलं होतं … वाण्याकडून सामान घेऊन घरी जातांना रस्त्यामध्ये लक्षात आलं की वाण्याने पैसे कमी परत दिले आहेत …वाटल घरी निष्काळ्जीपणासाठी आई ओरडेल आणि वाणी पैसे कमी दिल्याचे मान्य करणार नाही … त्या दिवशी प्रथम मी बापूंना हाक मारली वाटेत चालत असतांना … आणि काय आश्चर्य वाण्याने पैसे बाजूला काढूनच ठेवले होते व म्हणाला की त्याच्या ही लक्षात मी गेल्यावर ही गोष्ट आली …. बस्स  !!! तिथून बापूंवर विश्वास आणि प्रेम जडलं !!! आणि पाहता पाहता अनुभूतींची रांग लागली …

जगासाठी ते 'अनिरुद्ध धैर्यधर जोशी ' आहेत पण त्यांच्या भक्तांसाठी ते फक्त 'बापू' आहेत …ते अध्यात्मा वर प्रवचन करतात म्हणून त्यांना ' बापू ' नाव नाही पडलं , त्यांची आजी त्यांना लहानपणा पासून 'बापू' म्हणून हाक मारत असे आणि पुढे मग त्यांचं अनुकरण करून सर्वच मंडळी त्यांना 'बापू' म्हणून संबोधू लाग्ले.

 मला अध्यात्मं आणि विज्ञान ह्या दोघांमधील संबंध बापुंमुळे कळू शकला …माझ्या मनातल्या देवा विषयी असणा-या चुकीच्या संकल्पना बापुंनी दूर केल्या … देव भक्ती करणं म्हणजे नुसतंच एका जागी बसून राहून टाळ कुटत राहणं नाही हे बापुंनी समजावून दिलं … ' असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ' हे भगवंताला मान्य नसते , त्याला मानवाकडून फक्त उचित श्रमांची अपेक्षा असते आणि तो अश्या पवित्रमार्गीय, कष्टकरी भक्तांना सर्व काही देण्यासाठी आतुरच असतो हे बापुंनी नेहमीच सांगितलं आहे …

कोणतं ही क्षेत्र असो बापू त्यावर आपले प्रभुत्व गाजवतात … बापुंनी एकीकडे श्रीमद्पुरुषार्थ , मातृवात्सल्यविन्दानम , मातृवात्सल्य-उपनिषद ह्या सारखे आध्यात्मिक ग्रंथ लिहिलेत तर दुसरीकडे  जागतिक घडामोडींवर आधारीत ' तिसरे महायुद्ध ' हे पुस्तक लिहिले आहे … बापू एक उत्तम वक्ता , निपुण चित्रकार , संगीत प्रेमी आणि जाणकार , उत्कृष्ट गायक तसेच नृत्य, दिग्दर्शन , मूर्तीकला , बल विद्या ह्या सर्व गोष्टींमध्ये ही बापू प्रवीण आहेत … थोडक्यात सांगायचे झाले तर माझे बापू एक विलक्षण अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे … आज ही मी जेव्हा बापूंकडे पाहतो , त्यांचं कार्य  पाहतो तेव्हा त्यांचे विविध पैलू माझ्या डोळ्यासमोरून उलगडत जातात आणि थक्क व्हायला होतं   … त्यांचं व्यक्तिमत्व इतकं अफाट आहे की इथे मोजक्या शब्दांमध्ये त्याला मांडणं माझ्या सामर्थ्याच्या पलीकडील गोष्ट आहे .

बापू जीवनामध्ये आल्यामुळे मनाला एक खंबीर आधार मिळाला आहे …. आयुष्यात अडचणीच नाही उरल्यात असं नाही पण त्या अडचणींना कसं सामोरं जायचं आणि एखादी अडचण उदभवूच नये म्हणून कशा प्रकारे काळजी घ्यावी हे बापुंनी खूप सुंदररीत्या शिकवलं आहे मला  … ' काळजी करू नका काळजी घ्या ' हे त्यांचे बोल आता कायम स्मरणात असतात !

श्री राम
हर्ष पवार

2 comments:

  1. hari om
    harsh
    very nicely written. keep it up
    kaalajI karu nakaa kalaji ghyaa he jo shikavato toch apala khara aapta
    very nice points

    ReplyDelete
  2. हर्ष , आपले मनोगत वाचून मन बालपणीच्या आठवणींनी ओलेचिंब झाले. लहान मूल म्हणजे ओल्या मातीचा गोळा जणू काही , जसा आकार द्यावा तसा आकार घेते ह्याची अनुभूती आली. संस्काराचे माहात्म्य अगदी स्पष्ट रीत्या अत्यंत सोप्या शब्दांत मांडले आहे. आपला लेख त्यामुळेच खूप आवडला. जगदगुरु कृष्ण आणि अर्जुनाचे सख्यत्त्व ऐकून माहित होते पण एक सदगुरु हा सखा सारथी कसा होऊ शकतो हा प्रश्न नेहमी मनाला भेडसावयचा परंतु आपल्या जीवनात सदगुरु अनिरुद्ध जोशी ह्यांच्या येण्याने ते कसे साध्य होउ शकते ह्याचे मार्मिक उदाहरण त्या प्रश्नाचे सोपे उत्तर देते झाले आणि अशा ह्या सखा ,सारथी भूमिका निभावणार्या सद्गुरु अनिरुद्ध जोशी ह्यांच्या बाबत जाणण्याची उत्सुकता लागून राहिली आहे..
    धन्यवाद .....

    ReplyDelete